Ad will apear here
Next
करपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान!
अल्फ्रेड के. न्यूमॅनदुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांसाठी लढणाऱ्या सैनिकांनी आपल्या-आपल्यात संवाद साधण्यासाठी एका भाषेची निर्मिती केली. या भाषेचा उलगडा करण्यासाठी जपानी सैन्याने जंग जंग पछाडले; मात्र तिचा संपूर्ण छडा त्यांना कधीही लागला नाही. दुर्दैवाने या भाषेची माहिती इतरांपर्यंत फारशी पोहोचलीच नाही. हळूहळू ती भाषा झपाट्याने अस्तंगत होणाऱ्या भाषांपैकी एक ठरली. नवाहो नावाची ही कूटभाषा बोलू शकणाऱ्या शेवटच्या शिलेदारांपैकी एकाचे निधन गेल्या आठवड्यात झाले. त्या अनुषंगाने त्या भाषेबद्दलचा विशेष लेख... 
.....
सुमारे तीन वर्षांपूर्वी आलेल्या आणि आबालवृद्धांच्या पसंतीस उतरलेल्या ‘बाहुबली’ चित्रपटात अनेक आकर्षक गोष्टी होत्या. त्यासोबतच एक विचित्र गोष्टही होती. ती होती किलिकिली! होय, तीच ती कालकेय या खलनायकाच्या टोळीच्या तोंडी असलेली भाषा. एखाद्या भारतीय चित्रपटासाठी एखादी नवी भाषा तयार करण्याची ही पहिलीच वेळ होती. या भाषेत ७५० शब्द आणि व्याकरणाचे ४० नियम  असल्याचे सांगण्यात आले होते. त्यापूर्वी जेम्स कॅमेरॉनच्या ‘अवतार’ आणि ‘दी लॉर्ड ऑफ दी रिंग्ज’ या हॉलिवूडच्या चित्रपटांतही अशा भाषा रचण्यात आल्या होत्या.

या सर्व चित्रपटांचा समान धागा म्हणजे त्यातील युद्ध आणि संघर्ष! जेथे संघर्ष आहे आणि लाभ-हानीची शक्यता असते, तेथे संपर्कव्यवस्था अत्यंत कार्यक्षम असणे ही प्राथमिक गरज असते. त्यासाठी, प्रतिपक्षाच्या हाती आपली रहस्ये पडू नयेत, यासाठी गुप्त संदेश हा महत्त्वाचा भाग असतो आणि हा संदेश गुप्तच राहावा, यासाठी भाषेला गुप्ततेची डूब देणे ही निकडीची गोष्ट ठरते. अफझलखान येत असल्याची वार्ता समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कवितेतून पोहोचविल्याची गोष्ट किमान मराठी माणसांना तरी सांगायला नको. आपल्याकडे सर्रास वापरली जाणारी ‘च’ किंवा ‘क’ची भाषा हीही अशीच!

राजकारण आणि लष्करी लढायांमध्ये तर अशा रोचक गोष्टींचा खजानाच असतो. ‘युद्धस्य कथा रम्या’ म्हणतात ते काही उगीच नाही. रणांगणावरील प्रत्यक्ष लढाईशिवायही युद्धात इतक्या काही गोष्टी असतात आणि आपल्यासारख्या सामान्यांना त्या इतक्या अचंबित करतात, की सांगता सोय नाही.

आता हेच पाहा ना. दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांसाठी लढणाऱ्या सैनिकांनी आपल्या-आपल्यात संवाद साधण्यासाठी आणि माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी एका भाषेची निर्मिती केली. या भाषेचा उलगडा करण्यासाठी जपानी सैन्याने (अक्षरशः!) जंग जंग पछाडले; मात्र तिचा संपूर्ण छडा त्यांना कधीही लागला नाही. दुर्दैवाने या भाषेची माहिती त्या अमेरिकी सैनिकांनंतर इतरांपर्यंत फारशी पोहोचलीच नाही. पिकले पान गळावे तसे ही भाषा बोलणारा एक-एक ज्येष्ठ सैनिक काळाच्या पटावरून अंतर्धान होत गेला. अन् जगातील झपाट्याने अस्तंगत होणाऱ्या भाषांमध्ये या गुप्त भाषेचाही क्रमांक लागला.

नवाहो या नावाने ही कूटभाषा ओळखली जात होती. मूळ अमेरिकी आदिवासींच्या भाषेत काही भर घालून ही भाषा तयार करण्यात आली होती. ही कूटभाषा बोलू शकणाऱ्या शेवटच्या शिलेदारांपैकी एकाचे निधन गेल्या आठवड्यात झाले. त्यामुळे ‘नवाहो कोड’ची चर्चा पुन्हा सुरू झाली.

अल्फ्रेड के. न्यूमॅन असे या सैनिकाचे नाव होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेची फर्स्ट बटालियन, ट्वेंटी- फर्स्ट मरीन रेजिमेंट, थर्ड मरीन डिव्हिजन यात त्यांनी सेवा बजावली. त्यांनी न्यू मेक्सिकोत वयाच्या ९३व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. ही भाषा बोलणाऱ्यांना कोड टॉकर या नावाने ओळखले जाते. न्यूमॅन हे याच गटाचा भाग होते. आजही असे सुमारे एक डझन लोक जिवंत आहेत, असा या तुकडीतील सैनिकांना विश्वास आहे; मात्र महायुद्धानंतर दीर्घकाळ हा कार्यक्रम गोपनीय ठेवण्यात आल्यामुळे त्यांची निश्चित संख्या माहीत नाही. नवाहो हे अमेरिकेच्या वायव्येकडील भागांमध्ये राहणाऱ्या मूळ अमेरिकी जमातीच्या लोकांचे नाव, तसेच त्यांच्या भाषेचेही नाव. अमेरिकी सैन्यातील एका गटालाही याच नावाने ओळखले जात होते. कारण या गटाने नवाहोवर काही शब्दांचे कलम करून स्वतःपुरती एक गुप्त आणि अभेद्य भाषा तयार केली होती. आपल्या चाली, तुकड्यांच्या हालचाली आणि आदेश रेडिओ आणि टेलिफोनवरून देण्यासाठी ही भाषा वापरण्यात येत असे.  

या लोकांनी विकसित केलेली सांकेतिक भाषा जपानी लोकांसाठी मोठी डोकेदुखी ठरली होती. इवो जिमा, सायपान आणि पॅसिफिक महासागरातील अन्य क्षेत्रांमध्ये अमेरिकी सैन्याने मिळविलेल्या अनेक विजयांमध्ये या भाषेचे योगदान असल्याचे मानले जाते. उदाहरणार्थ, इवो जिमा येथे या कोड टॉकर्सनी ४८ तासांच्या अवधीत ८०० अचूक संदेश पाठवले होते.  

सध्या अगदी हाताच्या बोटावर मोजता येण्याजोगे कोड टॉकर जिवंत उरले आहेत. त्यातील तीन हयात कोड टॉकरना नोव्हेंबर २०१७मध्ये व्हाइट हाउसमध्ये सन्मानित करण्यात आले होते. त्या वेळी अध्यक्ष ट्रम्प यांनीही या विषयाची आपल्याला पूर्वी माहिती नव्हती, हे कबूल केले होते. तसेच त्यांनी जनरल जॉन केली यांनी सांगितलेले एक वाक्यही सांगितले होते . ते म्हणजे - ‘सर, ते किती महान होते, त्यांनी या देशासाठी काय केले याची तुम्हाला काहीच कल्पना नाही. या देशासाठी असलेल्या त्यांच्या शक्ती, बहादुरी आणि प्रेमाची आपल्याला कल्पना नाही.’

आता या मूळ अमेरिकी नवाहोंची भाषा अमेरिकी सैन्यात कशी आली, याचीही सुरस कथा आहे. ‘सीआयए’च्या म्हणण्यानुसार, नवाहो भाषेचा गुप्त कोड म्हणून वापर करण्याची योजना ही फिलिप जॉन्स्टन या सेनाधिकाऱ्याची. त्याचे बालपण नॅव्हाजोंच्या राखीव वस्त्यांमध्ये गेले होते आणि त्याचे आई-वडील मिशनरी होते.

तशीही अमेरिकी आदिवासींची भाषा संकेतभाषा म्हणून वापरण्याची कल्पना ही नवीन नव्हती. अमेरिकेच्या सैन्याने पहिल्या महायुद्धाच्या वेळी चोक्ट्वॉ या भाषेचा उपयोग केला होता; मात्र जर्मनी आणि जपानने दोन महायुद्धांच्या दरम्यानच्या काळात चोक्ट्वॉ व अन्य आदिवासी भाषांचा अभ्यास केला होता. नवाहो भाषेची वाक्यरचना आणि व्याकरण मात्र गैर-नवाहोंसाठी त्रासदायक आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ती लिखित नाही, केवळ तोंडी आहे. म्हणून मग अमेरिकी सैन्याने सॅन दिएगोजवळील कॅम्प इलियटमध्ये १९४२पासून २९ नॅव्हाजोंना भरती केले होते. त्यांनी २००पेक्षा जास्त नवीन नवाहो शब्दांची निर्मिती केली. हे शब्द सैन्याच्या विविध गोष्टींसाठी तयार करण्यात आले होते. सैनिकांना ते शब्द लक्षात ठेवावे लागत. हे शब्द शिकलेल्या १५ कोड टॉकरना ऑगस्ट १९४२मध्ये प्रत्यक्ष लढाईत सहभागी करून घेण्यात आले. ग्वाडालकॅन येथे पहिली लढाई झाली. त्यानंतर फर्स्ट मरीन डिव्हिजनचे कमांडर मेजर जनरल अलेक्झांडर व्हँडेग्रिफ्ट यांनी आपल्या वरिष्ठांना आणखी नवाहोंना पाठविण्याची विनंती केली.

‘नवाहो कोड अद्भुत आहे. शत्रूला तो कधीच समजू शकला नाही. आम्हालाही तो समजला नाही. परंतु तो काम करतो. आम्हाला आणखी काही नवाहो पाठवा,’ असे व्हँडेग्रिफ्ट यांनी म्हटले होते.

महायुद्ध संपेपर्यंत ३५०हून अधिक जणांनी ही सांकेतिक भाषा शिकली होती. ही भाषा घडविणाऱ्या २९ मूळ नवाहो कोड टॉकरना अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी २००१मध्ये काँग्रेशनल गोल्ड मेडल बहाल केले होते. त्या सैनिकांपैकी आज कोणीही जिवंत नाही. त्यांच्यापैकी शेवटचे सदस्य चेस्टर नेझ २०१४मध्ये मरण पावले.

अमेरिकी सैन्याने या योजनेवरील गोपनीयतेचे आवरण अनेक वर्षे काढले नव्हते. ते १९६८मध्ये हटविण्यात आले आणि त्यानंतर ही गोष्ट जनतेपर्यंत पोचली. न्यूमॅन यांच्यामुळे त्या सर्व घटनेला पुन्हा उजाळा मिळाला. ज्या आदिवासींना मारून युरोपीय सत्तांनी अमेरिका खंड हस्तगत केला, त्यांच्याच भाषेने त्यांना तारले हेही या निमित्ताने पुढे आले.

ज्ञान इतरांना वाटले की वाढते, असे म्हणतात. नवाहो काय किंवा आपल्या ‘च’ किंवा ‘क’च्या भाषेचे काय, त्या जर इतरांपर्यंत पोहोचल्या नाहीत, तर त्याही इतिहासात अशाच लुप्त होतील.... न फिरविल्यामुळे करपणाऱ्या भाकरीसारख्या! न्यूमॅन यांच्या निमित्ताने हेच सत्य अधोरेखित झाले!

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडियावरील त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZMWBW
Amit Asnikar nice ,interesting article. thanks for letting us know the short history of code language.
 Informative article, beautifully written..
 Superb ...Want to read all
Similar Posts
नंदीबैल, बकरा आणि गाय! ‘पेटा’ ही संस्था मुक्या प्राण्यांसाठी अनेक प्रकारची कामे करत असते. गेल्या आठवड्यात ‘पेटा’ने भाषेच्या प्रांतातही पाऊल टाकले आणि धमाल उडवून दिली. भाषेमध्ये, खास करून इंग्रजीत, प्राण्यांशी संबंधित अनेक वाक्प्रचारांवर आणि म्हणींवर ‘पेटा’ने आक्षेप घेतला आहे. हे वाक्प्रचार आणि म्हणी प्राण्यांशी क्रूरतेने वागण्यास
जो यंत्रावर विसंबला, त्याचा ‘प्रचार’ बुडाला...! गुगल ट्रान्स्लेट सेवा असो किंवा अन्य कोणतीही यंत्राधारित सेवा असो, ती आपल्याला भाषांतर करण्यासाठी बहुमोल मदत करू शकते; मात्र त्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहता येणार नाही. मूळ भाषकांपर्यंत जायचे असेल, तर त्याला मानवी स्पर्श मिळणे अत्यावश्यक आहे, हा धडा अमेरिकेच्या अध्यक्षपद निवडणुकीला उभ्या राहिलेल्या उमेदवारांच्या गफलतीतून मिळाला आहे
‘भाषा सेतू’च्या शताब्दीच्या निमित्ताने... दक्षिण भारतीयांचे स्वभाषेवर प्रचंड प्रेम असते, यात कोणताही वाद नाही. तरीही हिंदी हा शब्द उच्चारताच संपूर्णच्या संपूर्ण दक्षिण भारत नाक मुरडतो, हे काही खरे नाही. गेल्या आठवड्यात झालेल्या एका सोहळ्याने ही गोष्ट पुन्हा प्रकर्षाने समोर आणली. दक्षिणेतील राज्यांमध्ये हिंदीचा प्रचार करण्यासाठी झटणारी दक्षिण
हेच भाषेचे लोकशाहीकरण! ग्रेटचेन मॅककुलोच या लेखिकेचे ‘बीकॉज इंटरनेट - अंडरस्टँडिंग दी न्यू रूल्स ऑफ लँग्वेज’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. ते पुस्तक म्हणजे ‘नेट’क्या भाषिक बदलांचे दस्तावेजीकरण आहे. इंटरनेटला आलेले महत्त्व आणि त्याच्यामुळे अनौपचारिक लेखनामध्ये झालेली प्रचंड वाढ यामुळे भाषेत परिवर्तन शक्य झाल्याचे त्यांनी म्हटले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language